
छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या ७५ व्या वरिष्ठ पुरुष व महिला वयोगटांच्या आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला आहे.
या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाच्या निवडीसाठी एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटना व जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल पुरुष व महिला गटांच्या स्पर्धेचे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर करण्यात आले. स्पर्धेत पुरुष गटातून दहा व महिला गटातून तीन संघांचा समावेश झाला असून स्पर्धा प्रथम साखळीफेरीत व त्यांनतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

पुरुष गटात झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात एम एस डी संघाने ग्रामीण बास्केटबॉल संघास चित्तथरारक लढतीत ४७-४६ बास्केट म्हणजेच एक बास्केटच्या फरकाने पराभव केला, तर, युजीरो फायटर संघाने एस एस एम संघाचा ७२-४९ बास्केटच्या फरकाने पराभव केला.
सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या सामन्यांमधून सौरभ ढिपके, आदित्य दांडेकर, नेपू, विश्वाप्रताप राजपूत, रोहित वाघ, रोहन फुलाने, विपूल कड, अनिरुद्ध पांडे, अक्षय खरात, शुभम ठेंगे, शिवम गेडाई, प्रणव कोळेश्वर, अभय अहेरकर आदींनी प्रेक्षणीय खेळाचे प्रदर्शन केले.
बास्केटबॉल पंच म्हणून संदीप ढंगारे गजानन दीक्षित, किरण परदेशी, यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन प्राचार्य डॉ मकरंद जोशी, मनपा शाळेचे मुख्याध्यापक जाधव, तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव मनजीत दारोगा, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, सचिन परदेशी आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले.