
हीथर नाइटच्या नाबाद ७९ धावांची खेळी निर्णायक, इंग्लंड चार विकेटने विजयी
गुवाहाटी ः हीथर नाइट (नाबाद ७९) आणि शार्लोट डीन (नाबाद २७) यांच्या दमदार फलंदाजीसह नाबाद ७९ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला संस्मरणीय विजय मिळवून दिला. महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड महिला संघाने बांगलादेश महिला संघाची कडवी झुंज मोडून काढत चार विकेट राखून विजय साकारला.
बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करत ४९.४ षटकात सर्वबाद १७८ धावसंख्या उभारली. शोभना मोस्टारी हिने सर्वाधिक ६० धावांची खेळी करत डावाला आकार दिले. तिने १०८ चेंडूंचा सामना करत आठ चौकार मारत अर्धशतक साजरे केले. शर्मीन अख्तर हिने सहा चौकारांसह ३० धावा फटकावल्या. राबेया खान हिने २७ चेंडूत नाबाद ४३ धावा फटकावत डावाला आकार दिला. तिने सहा चौकार व एक षटकार मारला. या फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य बांगलादेश फलंदाज इंग्लंडच्या प्रभावी गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले.
इंग्लंड महिला संघाच्या सोफी एक्लेस्टोन हिने २४ धावांत तीन विकेट घेऊन सामना गाजवला. चार्ली डीन (२-२८) आणि अॅलिस कॅप्सी (२-३१), लिन्सी स्मिथ (२-३३) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
इंग्लंड संघासमोर विजयासाठी १७९ धावांचे आव्हान होते. ही धावसंख्या इंग्लंड संघ सहजपणे गाठेल अशी अपेक्षा होती. मात्र, बांगलादेशची वेगवान गोलंदाज मारुफा अख्तर हिने भेदक मारा करत इंग्लंडला दबावात आणले. मारुफ हिने एमी जोन्स (१), टॅमी ब्यूमोंट (१३) या सलामी जोडीला स्वस्तात बाद करुन इंग्लंडला मोठा धक्का दिला.
हीथर नाइट व नॅट सायव्हर ब्रंट या जोडीने दबावात फलंदाजी करत डाव सावरला. ब्रंट हिने पाच चौकारांसह ३२ धावा काढल्या. फहिमा खातून हिने ब्रंटला बाद करुन सामन्यात रंगत आणली. सोफिया डंकले (०), एम्मा लँब (१) या फहिमाने बाद करुन सामन्यात रोमांच आणला. कॅप्सी २० धावांवर बाद झाली. त्यानंतर हीथर नाइट व शार्लोट डीन या जोडीने चिवट फलंदाजी करुन संघाला विजय मिळवून दिला. हीथर नाइट हिने १११ चेंडूंत नाबाद ७९ धावा फटकावत संघाला स्मरणीय विजय मिळवून दिला. तिने आठ चौकार व एक षटकार मारला. डीनने ५६ चेंडूंत नाबाद २७ धावांचे योगदान दिले.
बांगलादेशकडून फहिमा खातून (३-१६), मारुफा अख्तर (२-२८) यांनी घातक गोलंदाजी करुन इंग्लंडला विजयासाठी झुंजवले.