
निरामय स्वास्थ्यासाठी आरोग्य मानव उपक्रम प्रेरणादायी ः कुलगुरू
नाशिक ः समाजातील प्रत्येकाच्या निरामय स्वास्थासाठी विद्यापीठातील ’आरोग्य मानव’ उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपापदन कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आवारातील ’आरोग्य मानव’ उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, नाशिकचे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औंटी, लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर, डॉ विलास वांगिकर, डॉ सचिन मुंबरे, डॉ वाय प्रवीण कुमार, डॉ राजकुमार पाटील, डॉ वर्षा फडके, डॉ श्रीलेखा राजेश, डॉ धनाजी बागल, उपअभियंता अभिजित शेलार, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, शाखा अभियंता योगेश गोडसे, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, डॉ संदीप कडू, बी जे सोनकांबळे, संजय मराठे, महेश बिरारीस उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, मानवी अवयवांकरीता आवश्यक औषधी वनस्पती व त्यांचे महत्व सर्वांना समजावे या दृष्टीकोनातून विद्यापीठ परिसरात ’आरोग्य मानव’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये डोके, डोळे, फुफ्फुस, हृदय, पोट, यकृत आदी अवयवांच्या आकारात त्या-त्या अवयवकरीता उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. आरोग्य पर्यटनाला चालना मिळावी, विद्यापीठाचा परिसर वृक्षसंपदेने भरुन निघावा आणि आपल्या आरोग्यकरीता उपयोगी वनस्पतींची सहजतेने माहिती होण्यासाठी ’आरोग्य मानव’ उपक्रम महत्वपूर्ण आहे.
कानिटकर पुढे म्हणाल्या की, ’आरोग्य मानव’ च्या केंद्रस्थानी ज्ञानमुद्रेतील मानवी मुर्ती असून त्यामध्ये षट्चक्र दर्शविण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी, शिक्षक व अभ्यागत भेट देतील. विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस व आरोग्य मानवाच्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलगुरूंच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’आरोग्य मानव’ हा अनोखा उपक्रम आहे. आरोग्य आणि पर्यटन यांची सांगड घालून निर्सगाशी जोडण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी या उपक्रमाकरीता मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उपक्रमाविषयी माहिती देतांना विद्यापीठाच्या आयुष विभागाच्या प्रमुख डॉ गीतांजली कार्ले यांनी प्रकल्पात मानवाकृती मध्ये वेगवेगळे अवयवांचे आकार दर्शविलेले आहेत. प्रत्येक अवयवाकरिता उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड त्या-त्या अवयवामध्ये केलेली आहे. जसे श्वसन संस्थेमधे उपयुक्त वनस्पतींची फुफ्फुसांमधे लागवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील ’आरोग्य मानव’ उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विद्यापीठातील अधिकारी डॉ सुनील फुगारे, महेंद्र कोठावदे, डॉ नितीन कावेडे, प्रकाश पाटील, संदीप कुलकर्णी, संदीप राठोड व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.