
तात्काळ कारवाईची मागणी, संघटकांकडून क्रीडा उपसंचालकांना निवेदन
छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत काही शाळांनी नियमांना हरताळ फासून बाहेरच्या खेळाडूंना संघात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव युवराज राठोड, प्रा चंद्रकांत गायकवाड, मुख्याध्यापक बाळासाहेब सारुक, प्रा ज्ञानदेव मुळे यांच्या शिष्टमंडळाने क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. कबड्डी संघटक व शिक्षकांनी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांना निवेदन दिले. त्यावेळी प्रा युवराज राठोड यांच्यासोबत डॉ अरविंद कांबळे, प्रा शरद हिंगे, प्रा भाऊसाहेब वाघ, प्रा दिगंबर काळे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये स्थानिक खेळाडूंऐवजी इतर तालुक्यातील खेळाडूंना सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे खरी प्रतिभा मागे पडत असून, स्पर्धेचा दर्जाही घसरत आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रा राठोड यांनी सांगितले की, “खेळाडू तयार करण्याचे आणि स्थानिक प्रतिभेला संधी देण्याचे उद्दिष्ट असलेल्या शालेय स्पर्धांचा गैरवापर होऊ नये. नियमबाह्य खेळाडूंवर तात्काळ कारवाई करून संबंधित शाळांवर योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करावी.” यावर क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी निवेदनाची नोंद घेऊन तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
प्रा चंद्रकांत गायकवाड यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली असून बाहेरचे खेळाडू खेळवून स्पर्धा जिंकणे हा प्रकार खेळासाठी मारक ठरणारा असून यामुळे खेळाडूंचा कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत यासाठी कडक कारवाईची आवश्यकता आहे. क्रीडा विभाग या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करेल अशी अपेक्षा असल्याचे प्रा चंद्रकांत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या विषयी योग्य कारवाई अहवाल प्राप्त झाल्यानंतर केली जाईल. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य उपाययोजना देखील केल्या जातील असे सांगितले.