
राज्याच्या क्रीडा धोरणात अनुभवी अधिकाऱ्याची भर
नाशिक : राज्य सरकारने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष कार्याधिकारी (ओएसडी) म्हणून जळगावचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची नियुक्ती केली आहे. क्रीडा प्रशासन क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभव, कार्यकुशलता आणि तळागाळातील क्रीडा विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराची ही औपचारिक दखल असल्याचे मानले जात आहे.
रवींद्र नाईक हे मुळचे नाशिकचे रहिवासी असून त्यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ क्रीडा विभागात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून जळगाव, नंदुरबार, ठाणे, अहिल्यानगर, धुळे, पुणे, नाशिक, रायगड आदी जिल्ह्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. काही काळ त्यांनी नाशिक येथे क्रीडा उपसंचालक पदाचाही कार्यभार सांभाळला होता.
तळागाळातील खेळाडूंना संधी देण्यावर भर
आपल्या कार्यकाळात नाईक यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. ‘एक गाव – एक खेळ’, ‘क्रीडा साक्षरता अभियान’ आणि ‘शालेय स्पोर्ट्स डेव्हलपमेंट प्लॅन’ यांसारख्या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये क्रीडा केंद्रित वातावरण निर्माण झाले. खेळाडूंना मैदान, साहित्य, प्रशिक्षण सुविधा आणि प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली. तसेच आदिवासी बहुल भागात पाड्यांच्या आश्रमशाळावर भेटी देऊन त्यांना क्रीडा साहित्य वितरित करणे..जिल्हा परिषदांच्या शाळांना क्रीडांगण विकास योजना माध्यमातून क्रीडा साहित्य उपलब्ध करू दिले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळवून दिले. वरिष्ठ महाविद्यालयांशी एमओयू करून क्रीडा विभागाच्या योजना राबवल्या आहेत.
कार्यक्षम प्रशासक आणि मार्गदर्शक अधिकारी
क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना, प्रशिक्षक आणि शिक्षक यांच्याशी सुसंवाद ठेवत नाईक यांनी प्रशासनिक आणि संघटनात्मक कार्यात समतोल साधला. त्यांचे नियोजन, समन्वय कौशल्य आणि काटेकोर कार्यशैली हे त्यांच्या यशाचे मुख्य घटक ठरले आहेत. अनेक उदयोन्मुख खेळाडू आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.
राज्यस्तरीय जबाबदारीकडे वाटचाल
नवीन पदावर त्यांच्यासमोर राज्यातील क्रीडा धोरणांच्या अंमलबजावणीसह युवा कल्याण कार्यक्रमांच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि तळागाळाशी असलेला दुवा राज्याच्या क्रीडा धोरणांना अधिक सक्षम दिशा देईल, अशी अपेक्षा क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे.रवींद्र नाईक यांच्या नियुक्तीबद्दल क्रीडा क्षेत्रातील सहकारी अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी अभिनंदन व्यक्त केले असून, राज्यातील क्रीडा विकासाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.