मुंबई ः महाराष्ट्राचे माजी क्रीडा, उद्योग मंत्री माजी आमदार आणि कबड्डीचे माजी संघटक शामराव अष्टेकर यांचे बुधवारी पुण्यात सकाळी अकरा वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. शामराव अष्टेकर दोन वेळा आमदार होते. तीन वेळा त्यांनी मंत्री पद भूषवले होते.
रणजीत या आपल्या मुलांसमवेत ते पुण्यात राहत होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. शामराव आष्टेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कराड आणि सातारा परिसरातील क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. विशेषतः पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे कराड आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.