
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत ब गटातून एम एस डी संघाने अग्रस्थान मिळवले तर चॅम्पियन अ दुसऱ्या स्थानी राहिला.
नागपूर येथे २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या ७५ व्या वरिष्ठ पुरुष व महिला वयोगटांच्या आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाच्या निवडीसाठी एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटना व जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल पुरुष व महिला गटांची स्पर्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल मैदानावर घेण्यात आली.
पुरुष गटात साखळी फेरीच्या सामन्यात एम एस डी संघाने अनपेक्षितरित्या चॅम्पियन अ संघाचा ५५-३९ बास्केटच्या फरकाने पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सत्रात चॅम्पियन-अ संघ १३-१०, दुसऱ्या सत्रात १०-१० अशा तीन गुणांच्या फरकाने आघाडीवर होता, मात्र सामन्याच्या तिसऱ्या सत्रात एम एस डी संघाने १४-२ व चौथ्या सत्रात २१-१४ बास्केटच्या फरकाने अनपेक्षितपणे मुसंडी मारीत निर्णायक बास्केटची आघाडी घेत सामना शिताफीने खिशात घातला. सामन्याच्या उत्तरार्धात विजय गाडे, शर्विन तनावडे, सौरभ ढिपके, आर्य शिरसाठ यांनी निर्णायक खेळी करीत सामना जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला व ब गटातून अव्वल स्थान पटकावले, चॅम्पियन अ संघ द्वितीयस्थानी आला, चॅम्पियन अ संघातर्फे नरेंद्र चौधरी, शुभम लाटे, अभिषेक अंभोरे, यांनी दुरून बास्केट करण्याच्या नादात सामना गमावला.
स्पर्धेच्या अ गटातील साखळी फेरीच्या सामन्यात चॅम्पियन ब संघाने एम एस एम संघाचा अटीतटीच्या लढतीत ४८-४४ बास्केटच्या फरकाने पराभव केला. दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघातील राजेश्वर परदेशी, अजय सोनवणे, प्रदीप लाटे, रुद्राक्ष यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत संघ विजयी होण्यात मोलाचा वाटा उचलला, तर पराभूत एम एस एम संघातर्फे प्रणव कोळेश्वर, रुद्राक्ष पांडे, अभय अहेरकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणात अचूक बास्केट नोंदवण्यात ते कमी पडले.
तत्पूर्वीच्या सामन्यात युजिरो फाईटर संघाने वारीयर्स संघाचा ४६-३६ बास्केटच्या फरकाने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत विजय संपादन केला. विजयी संघातर्फे विपूल कड, अनिरुद्ध पांडे, अक्षय खरात, शुभम ठेंगे, व शिवम गेडाई यांनी चौफेर कामगिरी करीत संघ विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला, पराभूत वॉरियर्स संघातर्फे मृदुला खेमका, रविराज राठोड, आर्यन बाहेती, शर्थीने लढले मात्र त्यात ते अयशस्वी ठरले,
अन्य पुरुष गटाच्या सामन्यात चॅम्पियन अ संघाने ग्रामीण पोलीस संघाचा ६०-३० बास्केटच्या फरकाने पराभव केला
बास्केटबॉल पंच म्हणून संदीप ढंगारे गजानन दीक्षित, किरण परदेशी, प्रशांत बुरांडे, सचिन परदेशी, अनिस साहुजी, समाधान बेलेवार आदींनी काम पाहिले. सामना दरम्यान प्राचार्य डॉ मकरंद जोशी, संजय डोंगरे, मनजित दारोगा, गणेश कड आदींची उपस्थिती लाभली.