
मुंबई : शहापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्याआंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्या विशाल जाधव, कोमल पटेल, मनीषा शेलारने सुवर्ण तर सुरज माने, सुदिक्षा जैस्वारने कांस्य पदकाची कमाई केली.
विशाल जाधवने ९७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकताना जे आर साळवी कॉलेजच्या विपुल परबला ९-० गुणांनी सहज नमविले. कोमल पटेलने ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकताना अंतिम सामन्यात बी के बिर्ला कॉलेजच्या भूमी भोईरला आरामात चितपट केले. मनीषा शेलारने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाच्या लढतीत रिझवी कॉलेजच्या सबा शाहला देखील लिलया चितपट करुन अव्वल क्रमांक मिळवला.
सूरज माने याने ८६ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. ह्या चारही पैलवानांनी भाईंदर येथील अभिनव कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्सचे प्रतिनिधित्व करत आपल्या अभिनव कॉलेजचे नाव रोशन केले. सुदिक्षा जैस्वारने ६२ किलो वजनी गटामध्ये कांस्य पदकाची कमाई केली. सुदिक्षा सांताक्रुझ येथील सेंट अँड्रूज कॉलेजात शिकत आहे.
अभिनव कॉलेजच्या पैलवानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत मुलांच्या व मुलींच्या तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली, त्यांना अभिनव कॉलेजचे पीटी शिक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्ण पदक विजेत्यांची निवड अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता झाली आहे.
तसेच श्री गणेश आखाड्यात सराव करणाऱ्या ओम सुनील जाधवने पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटात ९२ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले. सर्व पदक विजेत्या पैलवानांना आखाड्याचे प्रमुख वसंतराव पाटील, प्रशिक्षक वैभव माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.