जालना महिला संघाची विजयाची हॅटट्रिक 

  • By admin
  • October 9, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

आरोही आहेरचे आक्रमक शतक, मानिनी वायाळची प्रभावी गोलंदाजी 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १५ महिला निमंत्रित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने ज्युडिशियल महिला संघाचा तब्बल १०० धावांनी पराभव केला. आरोही आहेर हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

जस्ट क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकात सहा बाद १८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना ज्युडिशियल संघ २२.५ षटकात अवघ्या ८० धावांत गडगडला.

या सामन्यात आरोही आहेर हिने शानदार फलंदाजी करत शतक साजरे केले. तिने ११८ चेंडूंचा सामना करताना १०८ धावा फटकावल्या. तिने १८ चौकार व १ षटकार मारला. आरती साळुंके हिने सात चौकारांसह ३५ धावांची वेगवान खेळी केली. अपूर्वा रुपनर हिने २० धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत मानिनी वायाळ हिने घातक गोलंदाजी करत अवघ्या ११ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. संजना म्हस्के हिने १६ धावांत दोन बळी घेतले. अपूर्वा रुपनर हिने १७ धावांत दोन गडी बाद केले. जालना संघाने या स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक  साजरी केली आहे. या संघाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *