
मुस्लिम क्रिकेट चॅम्पियनशिप ः मोहम्मद इम्रान व फिदा हुसेन सामनावीर
नागपूर ः मुस्लिम क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत साबा वॉरियर्स संघाने ताडोबा टायगर्स संघावर ७९ धावांनी दणदणीत विजय साकारला. नागपूर टायटन्स संघाने रॉकेट इंटरनॅशनल स्पार्टन्स संघाचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यांमध्ये मोहम्मद इम्रान आणि फिदा हुसेन यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पहिल्या सामन्यात ताडोबा टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. साबा वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद २१२ असा धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाठलाग करताना ताडोबा टायगर्स संघाने २० षटकात आठ बाद १३३ धावा काढल्या. ताडोबा संघाला ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात मोहम्मद इम्रान याने ४४ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. त्याने तीन षटकार व चार चौकार मारले. अमान हुसेन याने ३९ चेंडूंत ६३ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. सय्यद अली याने ४६ चेंडूत ६१ धावांचे योगदान दिले. त्याने नऊ खणखणीत चौकार मारले.
गोलंदाजीत हसनैन हुसेन याने २९ धावांत तीन गडी बाद केले. शेख जुबेर याने ११ धावांत दोन बळी टिपले. मुहम्मद साबीर याने २१ धावांत दोन विकेट घेतल्या.

रॉकेट स्पार्टन्स संघ पराभूत
दुसरा सामना रॉकेट इंटरनॅशनल स्पार्टन्स आणि नागपूर टायटन्स यांच्यात झाला. रॉकेट स्पार्टन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सर्वबाद १३५ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत नागपूर टायटन्स संघाने १६.२ षटकात चार बाद १३८ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात फिदा हुसेन याने ४७ चेंडूत ७० धावा काढल्या. त्याने दहा चौकार मारले. साबीर हुसेन याने ४५ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. त्याने दोन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. शाहनिवाज खान याने २३ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने दोन चौकार मारले.
गोलंदाजीत रिदान ललानी याने १६ धावांत तीन विकेट घेतल्या. मोहम्मद करीम याने १६ धावांत दोन गडी बाद केले. मोहिब मेमन याने १९ धावांत दोन विकेट घेतल्या.