
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः श्रेयस पाथ्रीकर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत राऊडी सुपर किंग संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघावर पाच विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यांत श्रेयस पाथ्रीकर याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. व्हिजन क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १४६ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना राऊडी सुपर किंग संघाने १४.५ षटकात पाच बाद १४७ धावा फटकावत पाच विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात श्रेयस पाथ्रीकर याने ५५ चेंडूंत ७५ धावा काढल्या. त्याने सात चौकार व चार उत्तुंग षटकार मारले. बाळू हिवराळे याने अवघ्या १७ चेंडूंत ३९ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने चार टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. ओम आगडे याने पाच चौकारांसह ३६ धावा काढल्या.
गोलंदाजीत राजू परचाके याने ३३ धावांत चार विकेट घेतल्या. आकाश लोखंडे याने ३८ धावांत चार गडी बाद करुन प्रभावी कामगिरी नोंदवली. निनाद खोचे याने ३३ धावांत दोन बळी घेतले.