
नॅडिन क्लार्कची वादळी खेळीने रिचा घोषची ९४ धावांची खेळी ठरली व्यर्थ
विशाखापट्टणम ः नॅडिन डी क्लार्क (नाबाद ८४) आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड (७०) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय महिला संघाचा पराभवाचा धक्का दिला. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान संघाचा हा पहिला पराभव ठरला. आफ्रिकेने तीन विकेट राखून रोमांचक विजय साजरा केला. भारताच्या रिचा घोषची धमाकेदार ९४ धावांची खेळी व्यर्थ ठरली.
भारतीय संघाने सहा बाद १०२ या खराब स्थितीतून सावरत सर्वबाद २५१ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची आघाडीची फळी स्वस्तात बाद झाली. ताझमीन ब्रिट्स (०), सुने लुस (५), मॅरिझॅन कॅप (२०), अँनेके बॉश (१) यांना भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात बाद करुन सामन्यावर संघाची पकड भक्कम केली. क्रांती गौड हिने ब्रिट्सचा शून्यावर घेतलेला अप्रतिम झेल संघाची कामगिरी उंचावण्यास मदतीचा ठरला. ३६व्या षटकात क्रांती गौड हिने कर्णधार लॉरा वोल्वार्डचा क्लिनबोल्ड करुन विजयातील मोठा अडसर दूर केला. लॉरा हिने ७० धावा काढल्या. तिने आठ चौकार मारले. तिचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करू शकला नाही.
क्लो ट्रायॉन व नॅडिन डी क्लार्क या जोडीने कडवी झुंज दिली. ट्रायॉनने ४९ धावांची दमदार खेळी केली. स्नेह राणा हिने तिला पायचित बाद करुन संघाला मोठे यश मिळवून दिले. तिने पाच चौकार मारले. क्लार्कने उत्तुंग षटकार ठोकत अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर क्लार्कने तुफानी फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलून टाकले. त्यामुळे विजयाकडे वाटचाल करत असलेला भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला. क्लार्कने भारतीय संघाच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. क्लार्कने ५४ चेंडूंत नाबाद ८४ धावा फटकावल्या. तिने तब्बल पाच षटकार आणि आठ चौकार मारले. या षटकारांनीच भारताचा पराभव निश्चित झाला. आफ्रिकेने ४८.५ षटकात सात बाद २५२ धावा काढल्या. क्रांती गौड (२-५९) व स्नेह राणा (२-४७) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताची दमदार फलंदाजी
रिचा घोषच्या धमाकेदार खेळीमुळे भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताचा डाव ४९.५ षटकांत २५१ धावांतच संपला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्यासह भारताची सुरुवात चांगली झाली आणि पॉवरप्लेमध्ये संघाला विकेटहीन राहिले. तथापि, मानधना बाद झाल्यानंतर भारताचा डाव डळमळीत झाला.
भारताची पहिली विकेट ५५ धावांवर पडली आणि त्यांनी १०२ धावांत सहा विकेट गमावल्या. भारतीय संघ कठीण परिस्थितीत असल्याचे दिसून आले, परंतु अमनजोत आणि रिचा यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला सावरले. अमनजोत बाद झाली असली तरी, रिचा घोषने धीर धरला आणि स्नेह राणासोबत आठव्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या, ज्यामुळे भारत २५० धावांच्या पुढे गेला. तथापि, रिचाने शेवटच्या षटकात तिची विकेट गमावली आणि तिचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले.
७७ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांसह ९४ धावा काढल्यानंतर रिचा बाद झाली. रिचा व्यतिरिक्त, प्रतिका रावलने ३७, स्नेह राणा यांनी ३३, मंधानाने २३, हरलीन देओलने १३, अमनजोत कौरने १३, हरमनप्रीत कौरने ९ आणि दीप्ती शर्माने ४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉनने तीन विकेट घेतल्या, तर मॅरिझाने कॅप, नादिन डी केक आणि नोनकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तुमी सेखुखुणेने एक विकेट घेतली.