
रणजी ट्रॉफी हंगामासाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर, पृथ्वी शॉ, जलज सक्सेनाचा समावेश
मोहित परमार
पुणे ः बीसीसीआय रणजी ट्रॉफी हंगामासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने रणजी संघ जाहीर केला आहे. शैलीदार फलंदाज अंकित बावणे हा महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. यावेळी महाराष्ट्र संघात धमाकेदार फलंदाज पृथ्वी शॉ, अष्टपैलू जलज सक्सेना यांचा प्रथमच समावेश करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सराव सामन्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ यांनी महाराष्ट्र संघ जाहीर केला. रणजी ट्रॉफी हंगामाला येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, राजू काणे यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र रणजी संघात अंकित बावणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, रुतुराज गायकवाड, सौरभ नवले, जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी, प्रदीप दाढे, हितेश वाळुंज, मंदार भंडारी, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे या खेळाडूंचा समावेश आहे.
महाराष्ट्र रणजी संघ जाहीर झाल्यानंतर कर्णधार अंकित बावणे म्हणाला की, एक फलंदाज व एक कर्णधार म्हणून संघासाठी योगदान देणे हे कायम आव्हानात्मक असते. एक फलंदाज म्हणून मोठी कामगिरी करायची आहेच पण एक कर्णधार म्हणून देखील मोठे योगदान द्यायचे आहे.
रणजी ट्रॉफी हंगामात महाराष्ट्र संघाचा पहिला सामना केरळ संघाशी १५ ऑक्टोबरपासाून होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र संघ चंदीगड (२५ ते २८ ऑक्टोबर), सौराष्ट्र (१ ते ४ नोव्हेंबर), कर्नाटक (८ ते ११ नोव्हेंबर), पंजाब (१६ ते १९ नोव्हेंबर), गोवा (२२ ते २५ नोव्हेंबर), मध्य प्रदेश (२९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर) या संघांविरुद्ध खेळणार आहे, असे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले.
रणजी ट्रॉफी स्पर्धेचे उपांत्य सामने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहेत. अंतिम सामना २४ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे.