
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व ओएनजीसी पुरस्कृत मलबेरी कॉटेज, मेटगुताड, महाबळेश्वर येथे रंगणाऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी गटात मिळून एकंदर २४० खेळाडूंनी भाग घेतला आहे.
पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरे तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर पुरुष गटात दुसरे मानांकन मुंबईच्या विकास धारिया व महिला गटात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने प्राप्त केले आहे.
सातारा हौशी कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उदघाटन शनिवारी (११ ऑक्टोबर) सकाळी ८.३० वाजता पुरुष एकेरी गटाने होणार असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव या स्पर्धेला हजेरी लावणार आहेत. तर महाबळेश्वर येथे बचाव व आपत्ती कार्य करणारे पोलीस मित्र सुनील भाटिया हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले आहे.
रविवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या उप उपांत्य फेरीपासूनच्या सर्व सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. सुरको कॅरमवर खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे मराठी, हिंदी व इंग्रजी मधून किशोर वागळे व मंदार बर्डे समालोचन करणार आहेत. महाबळेश्वर सारख्या पर्यटनस्थळी प्रथमच एवढी मोठी स्पर्धा होत असून राज्यातील विश्व् विजेते, आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय विजेत्यांचा खेळ महाबळेश्वरकरांना जवळून बघता येणार आहे.
क्रमवारी
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) झैद अहमद फारुकी (ठाणे), ४) अभिजित त्रिपनकर, ५) सागर वाघमारे (पुणे), ६) समीर महम्मद जबीर अंसारी (ठाणे), ७) महम्मद घुफ्रान (मुंबई), ८) प्रफुल मोरे (मुंबई).
महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) रिंकी कुमारी (मुंबई), ६) सोनाली कुमारी (मुंबई), ७) चैताली सुवारे (ठाणे), ८) मधुरा देवळे (ठाणे).