
जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत तीनही वयोगटात भैरवनाथ हायस्कूलचा दबदबा
धाराशिव ः भैरवनाथ हायस्कूल, धारूरच्या मुलींनी यंदा जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत इतिहास रचला आहे. श्री श्री रविशंकर विद्यालय, धाराशिव येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व धाराशिव जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत भैरवनाथ हायस्कूलने ९ पैकी ९ पदकं पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. ही शाळेची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली असून, खेळाडूंच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तीनही वयोगटात भैरवनाथचा दबदबा
या स्पर्धा अनुक्रमे १४, १७ आणि १९ वयोगटांमध्ये घेण्यात आल्या होत्या. भैरवनाथ हायस्कूलचा संघ तीनही गटांमध्ये उतरला होता. प्रत्येक गटात शाळेतील सहा मुलींनी सहभाग घेतला आणि प्रत्येकाने उत्कृष्ट कामगिरी करत पदक जिंकले.एकूण १८ मुलींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यापैकी तब्बल १५ मुली या भैरवनाथ हायस्कूलच्या आहेत – हीच या शाळेच्या क्रीडा सामर्थ्याची जाणीव करून देणारी बाब ठरली आहे.
विजेते खेळाडू
१४ वर्षांखालील गट ः प्रणिती शिंदे (प्रथम), धनश्री तांबे (द्वितीय), कल्याणी शिंदे (तृतीय), तसेच वेदिका जाधव (चतुर्थ), शर्वरी मनसुके (पाचवी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
१७ वर्षांखालील गट ः प्रतीक्षा पवार (प्रथम), राधा बंडगर (द्वितीय), नंदिनी रोकडे (तृतीय), पूजा खांडेकर (चतुर्थ), साक्षी शिंदे (पाचवी) व वैष्णवी गायकवाड (सहावी) या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१९ वर्षांखालील गट ः प्राची रोकडे (प्रथम), रिहाना सय्यद (द्वितीय), श्रेया पवार (तृतीय), श्रद्धा धुमाळ (सहावी) हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावर स्थान निश्चित केले.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे सहकार्य
या उल्लेखनीय यशामागे क्रीडा शिक्षक विजयकुमार कुलकर्णी यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि दत्ता देवकते यांचे तांत्रिक मार्गदर्शन मोलाचे ठरले. संस्थापक सचिव दत्तासाहेब बंडगर, अध्यक्ष दिनेश बंडगर, कार्याध्यक्ष आशोक देवकते, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी खेळाडूंचा सत्कार करत त्यांचे मनोबल उंचावले.
सर्वोत्तम कामगिरीचा अभिमान
भैरवनाथ हायस्कूलच्या मुलींनी दाखवलेली एकजूट, शिस्त आणि जिद्द यामुळे या वर्षीची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा ऐतिहासिक ठरली. या विजयाने शाळेचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला असून, आगामी विभागीय स्पर्धेतही या मुली नक्कीच चमक दाखवतील, असा विश्वास शिक्षकवर्ग आणि पालकांनी व्यक्त केला.