
नवी दिल्ली ः क्लच बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या गेममध्ये भारतीय बुद्धिबळ दिग्गज विश्वनाथन आनंदला गॅरी कास्पारोव्हकडून पराभव पत्करावा लागला. अशा प्रकारे महान खेळाडूंमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत कास्पारोव्हने २.५-१.५ अशी आघाडी घेतली.
बुद्धिबळ इतिहासातील सर्वात महान खेळाडू, ६२ वर्षांचा कास्पारोव्हने २१ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्याकडे अजूनही भरपूर बुद्धिबळ शिल्लक असल्याचे दाखवून दिले. आनंदलाही संधी होत्या पण त्यांचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला.
बुद्धिबळ ९६० फॉरमॅट अंतर्गत, दररोज दोन रॅपिड आणि दोन ब्लिट्झ सामने खेळले जातात. दिवसाचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिले, त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये कास्पारोव्हने आनंदचा पराभव केला. आनंदला जबरदस्तीने ड्रॉ करण्याची संधी होती पण तो हुकला. पहिल्या गेममध्ये आनंदचा वरचष्मा होता, परंतु भारतीय खेळाडूने अनफोर्स्ड चुका केल्या, ज्यामुळे माजी जागतिक नंबर वन कास्पारोव्हला पुनरागमन करता आले आणि ड्रॉ करता आला. दोन्ही खेळाडूंमधील दुसरा आणि चौथा सामनाही बरोबरीत सुटला.
सामन्याची एकूण बक्षीस रक्कम $१४४,००० आहे, ज्यामध्ये विजेत्याला $७०,००० आणि पराभूत झालेल्याला $५०,००० मिळतील. तसेच अतिरिक्त $२४,००० बोनस देखील आहे.