
काकीनाडा, आंध्र प्रदेश ः छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान टेनिसपटू प्रणव कोरडे याने आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे शुक्रवारी झालेल्या अखिल भारतीय आयटा प्रो सर्किट टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत उपविजेतेपद पटकावले. त्याने त्याचा साथीदार तेलंगणाचा विनीत मुत्था याच्यासोबत मिळून अंतिम फेरीत अव्वल प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली.
उपांत्य फेरीत प्रणव-विनीत युतीने यशवंत गुनापल्ली व धीरज रेड्डी या जोडीला ७-५, १-६, १०-८ असा पराभव देत पराभासी जोडीवर जोरदार विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत राहुल लोकेश व कौशिक यांच्यावर ७-५, ६-३ असा मात करत अंतिम सामन्यापर्यंत मार्गक्रमण केले. अंतिम सामन्यात प्रथम मानांकित मुनिम दीप व सजल केशवनी यांच्याशी अटीतटीचा सामना झाला, जिथे प्रणव-विनीत युतीला ६-३, ६-४ असा पराभव पत्करावा लागला.
प्रणव कोरडे याच्या या कामगिरीस प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या प्रणव आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करत असून हैदराबाद येथील सुरेश कृष्णा टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.
छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, देवगिरी प्रांत अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड श्रीकांत अदवंत, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद राष्ट्रीय सचिव व सीनियर कौन्सिल संजीव देशपांडे, तसेच डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अजय तल्हार व मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील ॲड अमरजीत गिरासे यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले आणि पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.