
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात सलग तिसऱया वर्षी विजेतेपद पटकावत जेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली आहे.
राजे संभाजी सैनिकी शाळा कांचनवाडी येथे शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये श्री सरस्वती भुवन प्रशाला संघाने अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान सलग तिसऱ्या वर्षी पटकावला. श्री सरस्वती भुवन प्रशालेचा संघ परभणी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या संघातील सार्थक सोनसाळे, वरद मोढे, अनिकेत आदमाने या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख संजय कंटुले, सुरज सुलाने, चंद्रशेखर पाटील, सुरेश मस्के यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष ज्ञानप्रकाश मोदानी, मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, उपमुख्याध्यापक अनिल देशमुख , पर्यवेक्षक संजय परदेशी, विजयकुमार चापाईतकर, अजिंक्य लोळगे, राहुल खाटीक यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले.