
सुरत (गुजरात) : वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या जलतरण तलावावर नुकतीच चौथी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वरिष्ठ जलतरणपटूंनी प्रभावी कामगिरी केली असून, छत्रपती संभाजीनगरचे जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एकूण तीन पदकांची (१ रौप्य, २ कास्य) कमाई करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.
राजेश भोसले हे जिल्हा परिषदेच्या अंबेलोहळ येथील प्रशालेचे क्रीडा शिक्षक, तसेच एमजीएम स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू व प्रशिक्षक आणि राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे प्रमुख आहेत. त्यांनी ५० वर्षांवरील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत तीन प्रकारात पदके मिळवली आहेत. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक, १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारता कांस्य पदक आणि ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.
या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील २५ वर्षांवरील पुरुष व महिला जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला होता. कठीण स्पर्धेतही राजेश भोसले यांनी आपल्या सातत्यपूर्ण सराव, कौशल्य आणि निष्ठेच्या जोरावर विजयी कामगिरी केली.
भोसले यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, विस्तार अधिकारी सुनिता सावळे-नवले, आणि मुख्याध्यापक आर आर दुम्मलवार यांनी अभिनंदन केले.
तसेच एमजीएम विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा नितीन घोरपडे, एमजीएम स्पोर्ट्स क्लबचे धनंजय फडके, जॉय थॉमस, तसेच राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे डॉ पंढरीनाथ पळसकर, अशोक जगताप, रविंद्र निकम, संतोष जोशी, रमेश शिंदे, गोपालकृष्ण नवले, महेंद्रसिंग पाटील यांनीही भोसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
राजेश भोसले यांच्या या राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे संभाजीनगर जिल्ह्यातील जलतरण क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, युवा जलतरणपटूंना मार्गदर्शक ठरणारा हा त्यांचा पराक्रम ठरला आहे.