
आर्या साळुंखे हिने पटकावले तीन पदकांसह अकरा लाखांचे बक्षीस
सातारा ः पटना (बिहार) येथे: केंद्र शासनाच्या वतीने आयोजित सातवी खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी राज्याचा झेंडा अभिमानाने फडकावला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याच्या तीन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई केली असून, केंद्र शासनाकडून एकूण सोळा लाख रुपयांची पारितोषिके जिंकली आहेत.
मलखांबपटू आर्या साळुंखे हिने स्पर्धेत एक सुवर्ण व दोन रौप्य पदके जिंकत साताऱ्याचा मान वाढवला. तिच्या कामगिरीबद्दल केंद्र शासनाकडून तिला अकरा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. आयुष विजयकुमार काळंगे याने मलखांब प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत एक रौप्य पदक मिळवले असून, त्याला तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तर तनिष्का रमेश कुंभार हिने थांगता (थांगता/योगा) या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवत दोन लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.
या सर्व विजेत्या खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत करण्यात आला. याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सीईओ याशनी नागराजन, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी खेळाडूंच्या जिद्दीचे व मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यातील खेळाडू सातत्याने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत असून, त्यांचे हे यश जिल्ह्यातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.