महिला टी २० चॅम्पियनशिप क्रिकेट ः सौम्या पुरी, अक्षया सुडके सामनावीर
नागपूर ः करीम स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला टी २० चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये माही बटलर संघाने एनसीए गर्ल्स संघाचा ४३ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने एनसीए गर्ल्स संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन केले. या लढतींमध्ये सौम्या पुरी आणि अक्षया सुडके यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पांडव कॉलेज मैदानावर हा सामना झाला. माही बटलर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १४ षटकात पाच बाद ९६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एनसीए गर्ल्स संघ १४ षटकात चार बाद ५३ धावा काढू शकला. गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर माही बटलर संघाने हा सामना ४३ धावांनी जिंकला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्रीद्धिका हिने ३९ चेंडूंत ३० धावा फटकावल्या. तिने तीन चौकार मारले. चार्मी हिने २५ धावांची वेगवान खेळी केली. सौम्या पुरी हिने १६ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत सौम्या पुरी हिने ३ षटकात केवळ ८ धावांच्या मोबद्लयात २ विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. अष्टपैलू कामगिरीने सौम्या सामनावीर ठरली. रुतिका वासाडे हिने २३ धावांत दोन गडी बाद केले. चार्मी हिने ९ धावांत एक विकेट घेऊन अष्टपैलू ठसा उमटवला.
एनसीए गर्ल्स टीम पराभूत
एनसीए गर्ल्स संघाला सलग दुसरा सामना गमवावा लागला. यावेळी रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने एनसीए गर्ल्स संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला.
या सामन्यात एनसीए गर्ल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १९.३ षटकात सर्वबाद ७७ असे माफक लक्ष्य उभे केले. त्यानंतर रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने आक्रमक फलंदाजी करुन १३.२ षटकात तीन बाद ८० धावा फटकावत सात विकेट राखून विजय नोंदवला.
या सामन्यात वंशिका पांड्या हिने चार चौकारांसह आक्रमक २८ धावांची खेळी केली. सिद्धी यादव हिने २६ धावा काढल्या. तिने दोन चौकार मारले. मिताली हिने १८ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत अक्षया सुडके हिने प्रभावी गोलंदाजी करत १४ धावांत तीन विकेट घेतल्या. शुभी हिने अचूक गोलंदाजी करुन १० धावांत तीन बळी टिपले. सलोनी निमजे हिने १३ धावांत एक गडी बाद केला.
मुस्लिम क्रिकेट चॅम्पियनशिप सीझन २ चे आयोजन रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स नागपूरद्वारे करण्यात आले आहे. या सामन्याला प्रमुख अतिथी म्हणून रिदा स्पोर्ट्स बालाघाट येथील वाशिद कुरेशी सर आणि मोहम्मद शमी कुरेशी, वहाब पान दुकान, बैहार (एमपी) हे उपस्थित होते.