
मुंबई ः बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वरूप सावलकरने पुरुष गटात तर चारुशीला नाईकने महिला गटात विजेतेपद पटकाविले.
चारुशीला नाईकने (३ गुण) इंदिरा राणेला (२ गुण) शह देऊन अजिंक्यपदाला गवसणी घातली. विजेत्यांचे बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, बुध्दिबळ प्रशिक्षक सिद्धेश थिक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांनी अभिनंदन केले. स्पर्धेला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभले होते.
बेलार्ड पियर येथे ३९ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत निर्णायक पाचव्या साखळी फेरीमधील पहिल्या पटावर विजेतेपदासाठी फिडे गुणांकित बुद्धिबळपटू विकास महाडिक आणि स्वरूप सावलकर यामध्ये अटीतटीची लढत झाली.
स्वरूप सावलकरने हत्ती व घोड्याच्या यशस्वी चालीने विकासच्या राजाला ३२ व्या चालीमध्ये कोंडीत पकडले आणि साखळी ४.५ गुणासह उत्तम सरासरीच्या बळावर प्रथम स्थानावर झेप घेतली. तामोजित चक्रवर्तीने (४.५ गुण) द्वितीय, विकास महाडिकने (४ गुण) तृतीय, आशिष घाडगेने (४ गुण) चौथा तर कुंवरसिंगने (४ गुण) पाचवा क्रमांक पटकाविला. पहिल्या दोन क्रमांकाचे विजेते बुद्धिबळपटू राष्ट्रीय स्तरावरील आंतर विभागीय बीओबी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला बुध्दिबळ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.