
छत्रपती संभाजीनगरच्या केतकी ढंगारेची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः देहरादून (उत्तराखंड) येथे ६५ वी राष्ट्रीय सब-ज्युनियर मुलींची बास्केटबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच मुलांच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या विजयी संघात छत्रपती संभाजीनगरची उदयोन्मुख बास्केटबॉल खेळाडू केतकी ढंगारे हिचा समावेश होता. केतकीने संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
केतकीने याआधी सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाकडून खेळताना उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्या कामगिरीच्या जोरावर तिला महाराष्ट्र राज्याच्या संभाव्य संघात स्थान मिळाले आणि अखेर राष्ट्रीय संघातही निवड झाली.
केतकी वयाच्या आठव्या वर्षापासून चॅम्पियन क्रीडा मंडळ, बेगमपुरा येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेत आहे. तिला संजय डोंगरे व मंजितसिंग दरोगा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. केतकीला भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरे हिच्याकडून प्रेरणा मिळाली असून भविष्यात भारताकडून खेळण्याचे तिचे ध्येय आहे. सध्या ती शारदा मंदिर कन्या प्रशाला येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र संघात रुद्राने हल्ली गोगले (पुणे), साक्षी व्यास (पुणे), अनुष्का शुक्ला (पुणे), तनारीका चक्रवर्ती (पुणे), प्रिया कौशिक (पुणे), अरुणा राव (मुंबई नॉर्थ), संध्या जयशेवर (मुंबई नॉर्थ), वेदिका दवारे (सातारा), खुशी कोरगावकर (ठाणे), प्रचिता पाटील (कोल्हापूर), अनया माने (मुंबई साऊथ वेस्ट), केतकी ढंगारे (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव गोविंद मुथुकुमार, जिल्हा आणि तालुका बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संजय डोंगरे, सचिव मंजीतसिंग दारोगा, गणेश कड, विनोद गोस्वामी, सय्यद जमीर आदींनी केतकीचे अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.