
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कोकण कप विनाशुल्क निवड चाचणी शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला.
चुरशीच्या अंतिम फेरीत प्रसन्न गोळे याने निर्णायक क्षणी अचूक फटके साधत श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरच्या उमैर पठाणचे आव्हान २१-१३ असे संपुष्टात आणले. विजेत्यांना क्रीडाप्रेमी प्रकाश वाघमारे, संघटन सचिव प्रमोद पार्टे, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत शालेय कॅरम स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील ६४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये उपांत्य उपविजेते न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत व पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा पुष्कर गोळे तर उपांत्यपूर्व उपविजेते पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, ठाकूर रामनारायण स्कूल-दहिसरचे तीर्थ ठक्कर, शौर्य दिवेकर व मन्न भलाला यांनी पुरस्कार पटकाविले. ८ वर्षीय केवल कुलकर्णीला क्रीडाप्रेमी दीपक नाईक स्मृती चषक पुरस्काराने गौरविण्यात आले. पहिल्या आठ विजेत्यांना २५ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कोकण कप सुपर लीग मोफत शालेय कॅरम स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार आहे.