
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत बेगमपुरा येथील श्री हनुमान व्यायाम शाळेच्या मुलांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत बेगमपुरा येथील श्री हनुमान आखाड्याच्या मल्लांची कामगिरी लक्षवेधक ठरली. १४ वर्षाखालील वयोगटात सक्षम कांबळे याने ३५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. तर १७ वर्षांखालील वयोगटात मुजाहेद शेख याने ५५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले तसेच निशांत गहिरे यांनी देखील १७ वर्षे वर्षाखालील ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले.
या तिन्ही मल्लांची निवड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. यशस्वी मल्लांना डॉ हंसराज डोंगरे, प्रा मंगेश डोंगरे यांचे मार्गदर्शन आहे. या यशाबद्दल बेगमपुरावासीयांतर्फे अभिनंदन तसेच शुभेच्छा देखील देण्यात आल्या.