
आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
ठाणे : ठाणे महानगरपालिका जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ठाण्याचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे. राधा रावराणे, आराध्या मोहिते, अन्वी मोरे, शनाया ठक्कर, शारव शहाणे, रौनक यादव आणि अन्नामलाई या तरुण खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीच्या जोरावर पदके पटकावली तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे नुकतीच पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३५ हून अधिक शाळांतील तब्बल ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सांघिक गटांमध्ये आणि वैयक्तिक गटांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात शुभम राजे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले, तर १७ वर्षाखालील गटात डीएव्ही पब्लिक स्कूल विजेता ठरला. मुलींच्या गटातही सुलोचना देवी सिंघानिया स्कूल आणि होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवली.
वैयक्तिक गटांमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंची चमक अधोरेखित झाली.
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात शनाया ठक्कर (डीएव्ही पब्लिक स्कूल) हिने प्रभावी खेळ करत अजिंक्यपद पटकावले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात राधा रावराणे (सावित्रीदेवी थिराणी विद्यालय), आराध्या मोहिते (जेव्हीएमएस न्यू इंग्लिश स्कूल) आणि अन्वी मोरे (सुमतीदेवी सिंघानिया स्कूल) या तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात शारव शहाणे (सिंघानिया स्कूल) याने उपविजेतेपद मिळवले, तर रौनक यादव (सरस्वती विद्यालय, राबोडी) तृतीय क्रमांकावर राहिला. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अन्नामलाई (सुमतीदेवी सिंघानिया स्कूल) याने अजिंक्यपद पटकावत ठाण्याच्या विजयी मालिकेला बळ दिले.
या स्पर्धेत अनिका नायर आणि अश्विका नायर (होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल) यांनीही उत्कृष्ट जोडीदार खेळ करत आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंच्या एकत्रित यशामुळे ठाण्याचे बॅडमिंटन क्षेत्र अधिक बळकट झाले असून, या नवोदित खेळाडूंमध्ये भविष्यातील राज्य व राष्ट्रीय विजेत्यांची झलक दिसत आहे. या यशामागे अकॅडमीतील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कठोर प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ठाणेकरांसाठी ही स्पर्धा बॅडमिंटनच्या नव्या उर्जेला चालना देणारी ठरली असून, या तरुण विजेत्यांकडून आगामी काळात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.