शालेय बास्केटबॉल स्पर्धेत देवगिरी कॉलेज संघाला विजेतेपद 

  • By admin
  • October 13, 2025
  • 0
  • 61 Views
Spread the love

अंतिम सामन्यात नाथ व्हॅली संघाला ३५-२८ फरकाने हरवले

छत्रपती संभाजीनगर ः मनपा हद्दीतील जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालय संघाने चमकदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात देवगिरी संघाने नाथ व्हॅली संघाला चुरशीच्या लढतीत हरवले. 

मनपा हद्दीतील शालेय जिल्हास्तरीय १४, १७ आणि १९ वयोगटाखालील मुले व मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन सिडको एन-३ बास्केटबॉल मैदान येथे करण्यात आले होते. स्पर्धेच्या शेवटच्या सत्रात १७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटामध्ये एकूण २९ संघांचा सहभाग राहिला.

या स्पर्धेमध्ये १७ वयोगटाखालील मुलांच्या गटातील अंतिम फेरीच्या सामन्यात देवगिरी महाविद्यालयाने नाथ व्हॅली संघाचा प्रेक्षणीय लढतीत ३५-२८ बास्केटच्या फरकाने पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजयी देवगिरी संघातील जय, आयान, अथर्व व आदेश यांनी निकराची झुंज देत सामना जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. तर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या नाथ व्हॅली संघातील सक्षम, नमन व राजवीर यांनी अचूक बास्केट करण्याच्या अनेक प्रयत्न वाया घालवले व त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अंतिम फेरीच्या सामन्यासाठी विपूल कड, सौरभ दीपके व समाधान बेलेवार यांनी पंच म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावली. या स्पर्धेत तृतीय स्थानी वुड्रिज संघ आला तर एपीपीएस संघ चौथ्या स्थानी राहिला.

तत्पूर्वी, उपांत्यफेरीच्या सामन्यात देवगिरी महाविद्यालयाने औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कूल संघाचा ५८-३७ अशा फरकाने, तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नाथ व्हॅलीने वुड्रिज संघाचा ४२-३९ बास्केटच्या फरकाने पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्याला स्कोडा कंपनीचे राजेंद्र आंधळे, मनपा स्पर्धा प्रमुख सचिन परदेशी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे बास्केटबॉल प्रमुख पंकज परदेशी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

 स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मनपा स्पर्धा प्रमुख सचिन परदेशी, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव मंजित दारोगा, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे बास्केटबॉल प्रमुख पंकज परदेशी, तसेच बास्केटबॉल पंच विपूल कड, सौरभ दीपके, समाधान बेलेवार, सौरभ गाडेकर, अनिस साहुजी, धनंजय कुसाळे, सुरज कदम, अभय चौहान, गजानन दीक्षित, महेश इंगळे, दिनेश जायभाय, विजय मोरे, आकाश टाके आदींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *