
रोमांचक अंतिम सामन्यात नागपूर टायटन्स संघावर दोन विकेटने विजय
नागपूर ः करीम स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरतर्फे आयोजित मुस्लीम क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत साबा वॉरियर्स संघाने चमकदार खेळ करुन विजेतेपद पटकावले. रोमहर्षक अंतिम सामन्यात साबा वॉरियर्स संघाने नागपूर टायटन्स संघावर शेवटच्या चेंडूवर दोन विकेट राखून विजय नोंदवला.

शेवटच्या चेंडूंपर्यंत रोमांचक झालेला हा अंतिम सामना एनसीए नागपूर या मैदानावर खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात साबा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नागपूर टायटन्स संघाने प्रथम खेळताना २० षटकात सर्वबाद १२५ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना साबा वॉरियर्स संघाने २० षटकात आठ बाद १२८ धावा फटकावत दोन विकेट राखून रोमांचक विजय साकारला. माफक लक्ष्य असले तरी नागपूर टायटन्स संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन सामना अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली.

या सामन्यात सय्यद फूरकान रझवी याने ३२ चेंडूंत ४२ धावा फटकावत सुरेख फलंदाजी केली. त्याने सहा चौकार व दोन उत्तुंग षटकार मारले. अयान हुसेन याने ३१ चेंडूत ३१ धावांची वेगवान खेळी केली. त्याने एक चौकार व दोन षटकार मारले. मोहम्मद इम्रान याने चार चौकारांसह ३० धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत सोहेल अन्वर याने एकाच षटकात तीन विकेट घेऊन सर्वांची मने जिंकली. सोहेलने सामन्यातील सर्वात लक्षवेधक षटक टाकले. त्याने अवघी एक धाव देत तीन बळी टिपले हे विशेष. शेख जुबेर याने १३ धावांत तीन गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. मासुम खाटीक याने १७ धावांत दोन बळी टिपले.
पारितोषिक वितरण सोहळा
कार्यक्रमाचे विशेष पाहुणे शब्बीर अहमद विद्रोही, हाजी शब्बीर शफी (सबा डेव्हलपर), हाजी शोएब नबी खान हे उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे अर्शद अली (रौनक ऑप्टिक्स), चेतन रंगारी (ग्लोबस आयटीआय कॉलेज) आणि रिजवान उल हसन (राज घवई पब्लिक स्कूल) होते. इतर पाहुणे शहाबुद्दीन शेख, वहाब भाई, अयाज काझी, वकील बुरहान हसन, नोमान अन्सारी, शब्बीर हुसेन फिदा हुसेन (फोकस बॅट) आणि इतर होते. मोहम्मद करीम (संस्थापक संचालक, करीम स्पोर्ट्स), अबरार हुसेन (प्रमुख, क्रिकेट विकास आणि संचालन), मिसबाह उन नबी खान (रॉकेट इंटरनॅशनल), वकील सय्यद फुरकान रिझवी (अध्यक्ष, आयोजन समिती), बंटी सय्यद (सदस्य, शिस्त समिती), अख्तर हुसेन (सदस्य, शिस्त समिती) समिती) आणि इतर सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.
मुस्लिम क्रिकेट चॅम्पियनशिपचा शबीर हुसेन हा सर्वोत्तम फलंदाज, जुबैर शेख हा सर्वोत्तम गोलंदाज आणि मोहम्मद इम्रान हा मालिकावीर ठरला. अंतिम सामन्यात अयान हुसेनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. शेवटी, करीम स्पोर्ट्स संचालक मोहम्मद करीम यांनी सर्व पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे आभार मानले.