
महिला टी २० चॅम्पियनशिप ः आर्या पारवे सामनावीर
नागपूर ः करीम स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला टी २० चॅम्पियनशिप स्पर्धेत रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी के ४ ब्लास्टर संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवला. या सामन्यात आर्या पारवे हिने सामनावीर किताब संपादन केला.

नागपूर शहरातील गुरुनानक फार्मसी कॉलेज मैदानावर के ४ ब्लास्टर व रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स यांच्यात अंतिम सामना झाला. यात रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय अचूक ठरवताना के ४ ब्लास्टर संघाला १७.१ षटकात अवघ्या ५६ धावांवर रोखले. त्यानंतर रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाला विजयासाठी केवळ ५७ धावांची आवश्यकता होती. ही धावसंख्या १०.५ षटकात आणि चार विकेट गमावून गाठत रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाला जेतेपद पटकावले.

या सामन्यात फलंदाजी व गोलंदाजीत रॉकेट इंटरनॅशनल करीम स्पोर्ट्स गर्ल्स संघाने शानदार कामगिरी बजावत आपला दबदबा कायम ठेवला. सजल वर्मा हिने २० चेंडूत १७ धावांची सुरेख खेळी केली. तिने एक चौकार मारला. माही सिंग हिने अवघ्या सहा चेंडूंत १२ धावा फटकावल्या. तिने दोन चौकार मारले. नितीन वागद्रे हिने ११ धावांचे योगदान दिले. तिने एक चौकार मारला.
गोलंदाजीत आर्या पारवे हिने प्रभावी गोलंदाजी करुन ७ धावांत तीन विकेट घेतल्या. तिच्या या घातक गोलंदाजीमुळे त्यांचा विजय सोपा झाला. अनुष्का निनावे हिने ८ धावांत तीन गडी बाद केले. दिया भागवत हिने ८ धावांत दोन बळी घेतले.
महिला टी २० चॅम्पियनशिप स्पर्धेत रुपाली सहारे हिला सर्वोत्कृष्ट फलंदाज, अनुष्का निनावे हिला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि गायत्री मोहिते हिला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. हे तिन्ही खेळाडू के ४ संघाचे होते. शेवटी, करीम स्पोर्ट्स संचालक मोहम्मद करीम यांनी सर्व पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे आभार मानले.