
मुंबई ः अंतिम पाचव्या टप्प्यातील कोकण कप विनाशुल्क निवड चाचणी शालेय कॅरम स्पर्धेत ठाकूर रामनारायण स्कूल-दहिसरच्या तीर्थ ठक्कर याने अजिंक्यपद पटकाविले आणि को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई-सिबिईयुएम चषक जिंकला.
आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्पर्धेमध्ये प्रारंभापासून आघाडी घेत तीर्थ ठक्करने कनोसा हायस्कूलच्या वेदिका पोमेंडकरवर १५-६ असा विजय मिळविला. प्रारंभीचे तीन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या वेदिका पोमेंडकर हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाच टप्प्यातील निवडक सबज्युनियर कॅरमपटूची कोकण कप सुपर लीग विनाशुल्क कॅरम स्पर्धा २५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
दादर-पश्चिम येथील सिबिईयुएम सभागृहात झालेल्या उपांत्य सामन्यात वेदिका पोमेंडकरने अनुभवी खेळाच्या बळावर ८ वर्षीय केवल कुळकर्णीचे आव्हान संपुष्टात आणले. परिणामी मोठ्या गटात क्रीडाप्रेमी दीपक नाईक स्मृती विशेष पुरस्कार पटकाविणाऱ्या केवल कुळकर्णीचा अंतिम फेरीतील प्रवेश थोडक्यात हुकला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तीर्थ ठक्करने मन्न भलालाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत शालेय कॅरम स्पर्धेमध्ये विराज बर्वे, शिवांश मोरे, ओम सुरते, रविराज गायकवाड आदी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.