
देवगिरी महाविद्यालयात कलादालनाचे उत्साहात उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयामध्ये चित्रकला विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य कलादालनचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार प्रा. आप्पासाहेब काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर हे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर जेईई नीट सेलचे संचालक प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर हिवरे, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे, माजी उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात सुप्रसिद्ध चित्रकार प्रा आप्पासाहेब काटे म्हणाले की, “कला ही साधना आहे. तपश्चर्या आहे. चित्रकला ही सर्वोत्कृष्ट अशी कला मानली जाते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते जर ते मिळाले नाही तर कलाकार भरकटतो जसे की हिटलर सुद्धा चांगला चित्रकार होता. परंतु त्याला कला महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे तो हिंसक आणि विकृत झाला. त्याने लाखो ज्यू ची कत्तल केली. त्यामुळे चित्रकाराला योग्य प्रवेशाची आणि मार्गदर्शनाची गरज असते. तरच तो खूप काही करू शकतो. एका संपूर्ण पुस्तकाची माहिती एक चित्र सांगू शकते. एवढे या कलेचे महत्त्व आहे.
आज मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळांने देवगिरी महाविद्यालयामध्ये संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकांच्या सहकार्याने या शहरात प्रथमच एव्हढे चांगले कलादालन, चित्रकारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ही अत्यंत महत्त्वाची व गौरवाची गोष्ट आहे. याचा सर्व चित्रकार विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घेतला पाहिजे, असे प्रा आप्पासाहेब काटे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अशोक तेजनकर म्हणाले की, प्रत्येकाने आपल्यामध्ये कोणती कला आहे. ती ओळखली पाहिजे. तिची साधना केली पाहिजे. तिचा विकास केला पाहिजे. तिच्याशी मैत्री केली पाहिजे. म्हणजे जगणं सुंदर होईल आणि आरोग्य चांगलं राहील. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अशा पद्धतीचे उपक्रम आपण महाविद्यालयात सातत्याने राबवत असतो.
प्रा एन जी गायकवाड म्हणाले की, हे कलादालन उभारण्यासाठी संस्थेचे खूप मोठे सहकार्य लाभले आणि सर्वांनीच पुढाकार घेऊन कार्य केल्यामुळे एवढे उत्कृष्ट हे कलादालन तयार झाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शिवानंद भानुसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी चित्रकला विभागाच्या प्रा पल्लवी भोपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.