
युवकांना कला, कौशल्य व नवोपक्रम सादर करण्याची संधी
छत्रपती संभाजीनगर ः युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी, संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासाठी तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५-२६ चे आयोजन यंदा ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित हा युवा महोत्सव “सांस्कृतिक व नवोपक्रम” या विषयावर आधारित असून, विविध स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार करण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवात सांस्कृतिक गटांतर्गत समूह लोकनृत्य, लोकगीत तर कौशल्य विकास गटात कथा लेखन, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, कविता लेखन अशा उपक्रमांचा समावेश आहे. तसेच भारत चॅलेंज ट्रॅक या विशेष गटामध्ये १५ ते २९ वयोगटातील युवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नियम, अटी आणि पात्रतेनुसार पार पडतील.
स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे आणि चषक देण्यात येणार असून, विजेत्यांना राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल.
नोंदणीसाठी पात्रता १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी खुली असून, जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळे तसेच स्वतंत्र युवक-युवतींना सहभागाची संधी राहील.
नोंदणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरून फोटोसह स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात dso.abd@gmail.com या ईमेलवर ३ नोव्हेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्जाचा नमुना व नियमावली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी गणेश पाळवदे, क्रीडा अधिकारी (9518774575) यांच्याशी संपर्क साधावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली कला, संस्कृती आणि नवोपक्रम सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी आवाहन केले आहे.