
कळंब (धाराशिव) ः रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या वतीने आयोजित कळंब सिटी स्टेट लेव्हल ओपन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या सागर गांधी यांनी विजेतेपद पटकावले.
कळंब येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील तब्बल ३०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेला अप्रतिम प्रतिसाद दिला. स्पर्धा एकाच ओपन गटात खेळविण्यात आली असली, तरी निकाल व बक्षिसांचे विभाजन अंडर १२, अंडर १६ व ओपन गट तसेच ज्येष्ठ नागरिक या चार गटांमध्ये करण्यात आले. त्यामुळे सर्व वयोगटातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची आणि सन्मान मिळविण्याची संधी मिळाली.
खुल्या गटात वालचंद कॉलेज (सोलापूर) येथील फिजिक्स प्राध्यापक सागर गांधी यांनी अजिंक्यपद पटकावले. त्यांच्या अचूक खेळी, शांत विचार आणि रणनीतीपूर्ण डावाने त्यांनी सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. विजेत्यांना एकूण २५,००० रुपयांची रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्याम जाधवर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव भोरे, नंदकुमार सुरु, गोकुळ गोरे, चंद्रशेखर इंगळे, ढगे, स्वामी, पांडेकर व शिंदे यांनी संघटनात मोलाचे योगदान दिले. धाराशिव जिल्ह्यातील नवोदित बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन मिळवून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली. या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्यस्तरीय पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.