
पोलीस निमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धा
मुंबई ः पोलीस आयुक्तालय ग्रेटर मुंबई आणि पोलीस ढाल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ७८व्या पोलीस निमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या अ गटातील रोमांचक सामन्यात पी जे हिंदू जिमखान्याने डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीवर अवघ्या एका धावाने विजय मिळवला.
पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या या सामन्यात हिंदू जिमखान्याच्या अजित यादवने ११३ धावांची दमदार खेळी (१४७ चेंडू, ८ चौकार, ६ षटकार) करत संघाचा कणा मजबूत केला. त्याला गौतम वाघेलाने ६६ धावांची उपयुक्त साथ दिली. या जोडीच्या जोरावर हिंदू जिमखान्याने ६२.५ षटकांत सर्वबाद २४८ धावा केल्या. डी वाय पाटीलच्या निखिल गिरीने ५८ धावांत ५ बळी घेत उल्लेखनीय गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरादाखल, डी वाय पाटील एसए संघाने विजयासाठी झुंज दिली, मात्र हिंदू जिमखान्याच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना ५३.१ षटकांत २४७ धावांवर रोखले. इक्बाल अब्दुल्ला (६०) आणि सूरज शिंदे (५३) यांनी जोरदार प्रयत्न केले, पण विजय एका धावेने हातातून निसटला. हिंदू जिमखान्याच्या राहुल सावंत (३/५०) आणि मोहित अवस्थी (३/७५) यांनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली.
संक्षिप्त धावफलक
पी जे हिंदू जिमखाना ः ६२.५ षटकांत सर्वबाद २४८ (अजित यादव ११३, गौतम वाघेला ६६; निखिल गिरी ५/५८) विजयी विरुद्ध डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी – ५३.१ षटकांत सर्वबाद २४७ (इक्बाल अब्दुल्ला ६०, सूरज शिंदे ५३; राहुल सावंत ३/५०, मोहित अवस्थी ३/७५)