
धाराशिव ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय स्क्वॉश रॅकेट स्पर्धेला श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव येथे उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.
या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक अनंत कवडे आणि क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे तसेच सहसचिव कुलदीप सावंत, योगेश थोरबोले आणि अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात बोलताना पाहुण्यांनी विद्यार्थ्यांमधील क्रीडा संवर्धन, स्पर्धात्मक वृत्ती आणि शिस्त या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शालेय पातळीवर स्क्वॉशसारख्या जलद आणि रणनीतीपूर्ण खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या विभागीय स्पर्धेत नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदविला आहे. तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरण्याची ही उत्कृष्ट संधी मिळणार आहे. खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ भावना व क्रीडा शिस्त राखत सामने खेळले.
स्पर्धेचे पंच म्हणून राजाभाऊ शिंदे, महादेव बोंदर, बालाजी पवार, प्रशांत घुटे, संजय मडके आणि माऊली भुतेकर यांनी जबाबदारी पार पाडली. संपूर्ण स्पर्धा पारदर्शक, उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असल्याचे सर्व उपस्थितांनी गौरविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजाभाऊ शिंदे यांनी केले. त्यांनी या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशनचे मनःपूर्वक आभार मानले.
धाराशिवमध्ये प्रथमच विभागीय पातळीवरील स्क्वॉश रॅकेट स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पार पडत असल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या स्पर्धांमधून जिल्ह्याच्या पातळीवर नवे खेळाडू घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.