
पुणे ः पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत ईशान अर्जुन पीवाय, मेहेर शहा, हर्ष घाडगे, सई पाटील, अर्णव कदम, अनुष्का कुतवळ यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
डी एच इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सहाव्या फेरीत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ब्लूरीज पब्लिक स्कूलच्या ईशान अर्जुन पी वाय याने नोवेल इंटरनॅशनल स्कूलच्या केविन मथीयाझगनचा पराभव करून ५.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. याच मुलींच्या गटात एस एम चौकसी हायस्कूलच्या मेहेर शहाने आम्रिता विद्यालय सेकंडरी कॉलेजच्या प्रांजल राऊतचा पराभव करून ५ गुणांसह विजेतेपद पटकावले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात पेमराज सारदा कॉलेजच्या हर्ष घाडगेने एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या श्रेयस पाटीलचा पराभव करून ५ गुणांसह प्रथम स्थान मिळवले. मुलींच्या गटात पवार पब्लिक स्कूलच्या सई पाटील हिने न्यू इंग्लिश स्कूलच्या वेदश्री संतला बरोबरीत रोखले व ५.५ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या अर्णव कदमने लक्ष्य वाधवाचा पराभव करून ६ गुणांसह विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अनुष्का कुतवळ हिने सृष्टी गायकवाड बरोबरीत रोखले व ५ गुणांसह विजेतेपद मिळवले.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा चेस सर्कलचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातोश्री प्रतिष्ठान इंग्लिश एच डी स्कूल लोणीकंदचे पदाधिकारी व शिक्षक अरुणा तरळ, प्रीतेश तरळ, सुरज तरळ, क्रीडा शिक्षक गणेश कणसे, चीफ आर्बिटर दीप्ती शिदोरे व पवन कातकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले पाच खेळाडू सातारा येथे नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या महाराष्ट्र राज्य इंटरस्कूल बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतील.
या स्पर्धेत पुणे नगर व सोलापूर जिल्ह्य़ातील निवडून आलेले १२, १७ व १९ वयोगटातील मुले व मुली (एकूण २१०) खेळाडूंनी सहभाग घेतला होता.