पुण्यात राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा २५ ऑक्टोबरपासून रंगणार

  • By admin
  • October 15, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

अकराशेहून अधिक खेळाडू सहभागी, सांघिक विभागात सव्वाशे संघांचा सहभाग

पुणे ः पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे २५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीमध्ये बालुफ ऑटोमेशन चषक ५४ नवी आंतर जिल्हा व ८७ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.‌ त्यामध्ये पृथा वर्टीकर, नैशा रेवसकर, प्रतीक तुलसानी, कुशल चोपडा यांच्यासह अकराशे हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. सांघिक विभागात सव्वाशे संघ सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस यांनी ही माहिती दिली यावेळी उपाध्यक्षा स्मिता बोडस, कार्याध्यक्ष प्रकाश तुळपुळे, स्पर्धा संचालक आशिष बोडस, संयोजन सचिव श्रीराम कोनकर, बालुफ ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उदय भालचंद्र उपस्थित होते. या स्पर्धेसाठी बालुफ ऑटोमेशन या जर्मन कंपनीचे मुख्य प्रायोजकत्व असून सूरज फाउंडेशन, डेक्कन डाईज व केमिकल इंडस्ट्रीज, शारदा ग्रुप व मते रिॲलिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉक्टर भालचंद्र हे माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू असून जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. सलग दहाव्यांदा या स्पर्धेच्या संयोजनपदाची जबाबदारी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेने स्वीकारली आहे.

ही स्पर्धा पुरुष व महिला, ११,१३,१५,१७,१९ वर्षाखालील मुले मुली या वैयक्तिक विभागात होणार असून ११ व १३ वर्षाखालील वयोगटाचा अपवाद वगळता अन्य सर्व गटांमध्ये सांघिक लढती होणार आहेत. या स्पर्धेसाठी २५ जिल्ह्यांमधून सव्वाशेहून अधिक संघ सहभागी होतील अशी अपेक्षा असून वैयक्तिक विभागात अकराशे पेक्षा जास्त प्रवेशिका अपेक्षित आहेत. त्यामध्ये पृथा वर्टीकर, नेशा रेवसकर, शौरेन सोमण, प्रतक तुलसानी, कुशल चोपडा, ईशान खांडेकर, मनुश्री पाटील, सेन्होरा डिसूझा, सागर कस्तुरे, जश मोदी यांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी एक लाख ५६ हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली असून पदके व चषकही दिले जाणार आहेत. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच मधुकर लोणारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा संयोजन समितीमध्ये महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, सचिव यतीन टिपणीस व आशुतोष पोतनीस व खजिनदार संजय कडू यांचाही समावेश आहे.

२५ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता स्पर्धेत प्रारंभ होणार असून अन्य दिवशी सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत सामने होणार आहेत स्पर्धेसाठी प्रिसाईज कंपनीच्या नवीन १६ टेबल्ससह २४ टेबल्सचा उपयोग केला जाणार आहे. तसेच स्पर्धेसाठी डबल फिश कंपनीचे चेंडू वापरले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *