
माझी आणि सुंदर शेट्टी सरांची ओळख साधारण ५० वर्षांपासून आहे. त्यांचे जुने मित्र आणि खेळाडू त्यांना अरे तुरेनी हाक अजूनही मारतात, काही जण तर शेटरु अशा खास नावांनी त्यांच्याशी सलगी करतात. पण मी मात्र शेट्टी या एकेरी नावापुढे कधी गेलो नाही. बॅडमिंटन आणि शेट्टी हे एक अतूट नाते आहे. ते मला आठवतंय तेव्हापासून बॅडमिंटन जगतात, खेळतात, विचार करतात, स्वप्न बघतात आणि त्यांच्या शरीरातील प्रत्येक नसानसात रक्त नसून बॅडमिंटन वहात आहे याबद्दल मला मुळीच संदेह नाही.
सुंदर शेट्टी नावाचा एक तरुण सुमारे पाच दशकांपूर्वी मुंबईत आला तो हॉटेल मध्ये नोकरी करण्यासाठी ! आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य, शिक्षण रूढार्थाने कमीच, बॅडमिंटनची पार्श्वभूमी शून्य, राहण्याची सोय नाही आणि या माणसाने अपार कष्ट करून मुंबईत आपला जम बसवला तो हॉटेल इंडस्ट्री मध्ये नव्हे, तर बॅडमिंटन क्षेत्रात हा एक चमत्कार आहे.
या माणसाने बॅडमिंटन खेळायला सुरुवात करून त्याच्या जोरावर रेल्वे मध्ये नोकरी मिळवली आणि ती ३५ वर्षे टिकवलीही ! नोकरी सांभाळून असंख्य व्याप केले. शटल आणि बॅडमिंटन या साहित्याचा व्यापार केला, राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळला, मुंबई आणि महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघटनेमध्ये अनेक दशके काम केले. असंख्य स्पर्धा आयोजित केल्या, अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले, अनेक होतकरू खेळाडूंना नोकरी मिळवून देऊन पोटापाण्याला लावले. सर्व खेळाडूंशी वैयक्तिक मैत्री जोडली आणि जोपासली आणि खरं सांगायचं म्हणजे बॅडमिंटन खेळासाठी सारे जीवन अर्पित केले.
बरं हे सारे करताना मी काही खास जगावेगळे करतो आहे असा आव कधीच आणला नाही. शोभा वहिनींच्या शिरावर घरची व संकेत आणि सागर अशा दोन्ही मुलांची जबाबदारी देऊन शेट्टी सरांची स्वारी दररोज एक छोटी बॅग व त्यात पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जी बाहेर पडत असे ती थेट सर्व दुनियाभरची कामे आटोपत रात्री ११ नंतरच घरी पोहोचायची. हा त्यांचा आयुष्यभराचा शिरस्ता ! शिवाय दिवसभराची वणवण चालत चालत आणि लोकल ट्रेनने! स्वतःच्या गाडीने फिरणे क्वचितच !
हा माणूस वेगळाच आहे. त्यांचे अनेकांशी विविध कारणांमुळे मतभेद झाले असतील पण कोणाशी शत्रुत्व नाही. बॅडमिंटनच्या महाराष्ट्राच्या व देशाच्या नकाशावर देखील शेट्टी सरांनी आपला ठसा उमटवला आहे. मुंबईत कोणीही खेळाडू बाहेरून आला की त्याला आधार शेट्टी सरांचा हे एक अतूट समीकरण आहे ! आणि याला प्रकाश पदुकोण देखील अपवाद नाही.
अत्यंत साधी रहाणी, जिद्दी आणि अत्यंत कष्टाळू स्वभाव या जोरावर त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर आपले स्थान बॅडमिंटन च्या क्षेत्रात सिद्ध केले. शेट्टी सरांचा १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वयाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी ते अत्यंत चिरतरुण आहेत. आजही स्पर्धांना जातात, लोकलने प्रवास करतात. रामाश्रयची इडली, डोसा आवडीने खातात. घरी बोलावून मित्रांना कोरी रोटी खिलवतात. स्वतः न पिता दुसऱ्याना पिलवतात आणि पारशी जिमखान्याची त्यांची फेरी देखील आजही चुकत नाही आणि यातूनच त्यांचे त्यांचे अनेकांशी असलेले जुने स्नेहसंबंध ते टिकवून ठेवतात.
बॅडमिंटन महर्षी अशी पदवी या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना द्यावी असे मला मनापासून वाटते. जीवेत शरद: शतम शेट्टीजी ! तुमचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने व उत्तम आरोग्यमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
- श्रीकांत वाड, ठाणे.
