
ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड
धाराशिव ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये नळदुर्गच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजची सुवर्णकन्या पौर्णिमा खरमाटे हिने चमकदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली.
बीड येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बनसारोळा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ज्यूदो स्पर्धेत पौर्णिमा खरमाटे हिने ७० किलो प्लस वजन गटात सुवर्णपदक मिळवत विजेतेपद पटकावले.त्यानंतर नळदुर्ग येथील आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजनगटात पौर्णिमाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आणि दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
या दुहेरी यशामुळे पौर्णिमा खरमाटे हिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या कामगिरीबद्दल कॉलेज आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पौर्णिमाला जुडोसाठी कैलास लांडगे व प्रवीण गडदे तसेच कुस्तीसाठी पैलवान संदीप वांजळे आणि कपिल सोनटक्के यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्राचार्य राठोड, तसेच सर्व प्राध्यापक व क्रीडाप्रेमींनी पौर्णिमाचे अभिनंदन करत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पौर्णिमाच्या या दुहेरी सुवर्णकामगिरीमुळे नळदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, ती अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.