
तेजल हबसनीस, इशिता खळेची चमकदार कामगिरी
नागपूर ः बीसीसीआयतर्फे आयोजित सीनियर महिला टी २० ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्र महिला संघाने पश्चिम बंगाल महिला संघाचा रोमांचक सामन्यात अवघ्या तीन धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली.
डागा महाविद्यालयाच्या मैदानावर हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सहा बाद १३३ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना बंगाल संघ २० षटकात सात बाद १३० धावा काढू शकला. अवघ्या तीन धावांनी महाराष्ट्र संघाने विजय साकारला.

महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. खुशी मुल्ला (०) धावांचे खाते न उघडता बाद झाली. गौतम नाईक (१), कर्णधार अनुजा पाटील (६) स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर ईश्वरी सावकार हिने ३४ चेंडूत ३३ धावांची वेगवान खेळी केली. तिने चार चौकार मारले. तेजल हसबनीस हिने सर्वाधिक ६३ धावांची खेळी करुन डावाला आकार दिला. तिने ४४ चेंडूत ६३ धावा काढताना सहा चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. तेजलच्या आक्रमक अर्धशतकाने डाव सावरला गेला.
श्वेता माने हिने दोन चौकारांसह १७ धावांचे योगदान दिले. मुक्ता मगरे (नाबाद १) व शिंदे (नाबाद २) यांना फार मोठा डाव खेळण्याची संधी मिळाली नाही. बंगालकडून सायका इशाक हिने २६ धावांत तीन गडी बाद केले. तीतस साधू हिने १८ धावांत दोन बळी टिपले.
पश्चिम बंगाल संघासमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान होते. धारा गुज्जर (४) लवकर बाद ओझाली. षष्ठी मोंडल (२२) व टी सरकार (२९) यांनी डावाला आकार दिला. ही जोडी बाद झाल्यानंतर मिता पॉल (०), प्रतिवा (५), ह्रषिता बसू (३) या लवकर बाद झाल्या. पी बाला (२७) आणि सुओष्मिता गांगुली (नाबाद ३०) यांनी झुंज दिली. परंतु, अन्य फलंदाजाची साथ न मिळाल्याने बंगाल संघ पराभूत झाला. इशिता खळे हिने १३ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या विजयाला मोठा हातभार लावला. मिरजकर हिने २५ धावांत दोन ज्ञानेश्वरी पाटीलने एक बळी घेतला.