
रणजी ट्रॉफी ः गतविजेत्या विदर्भ, मुंबई संघाचे पहिल्याच दिवशी सामन्यावर वर्चस्व
तिरुवनंतपुरम ः रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या हंगामाची महाराष्ट्र संघाची सुरुवात सनसनाटी ठरली. कर्णधारासह आघाडीचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाड याने चिवट ९१ धावांची खेळी करुन डाव सावरला. पहिल्या दिवस अखेर महाराष्ट्र संघाने गतउपविजेत्या केरळ संघाविरुद्ध सात बाद १७९ धावा काढण्यात यश मिळवले. पावसामुळे खेळ ५९ षटकानंतर थांबवण्यात आला.
गतउपविजेत्या केरळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी पहिल्या काही षटकातच योग्य ठरवला. केरळच्या वेगवान गोलंदाजांनी पृथ्वी शॉ (०), अर्शीन कु लकर्णी (०), सिद्धेश वीर (०) आणि कर्णधार अंकित बावणे (०) या आघाडीच्या फलंदाजांना धावांचे खाते न उघडू देता पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
मुंबई संघाविरुद्ध सराव सामन्यात धावांचा पाऊस पाडणारे फलंदाज पहिल्या डावात इतक्या लवकर बाद होतील असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु, प्रत्यक्षात आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. १.१ षटकातच महाराष्ट्र संघाची तीन बाद शून्य अशी दयनीय स्थिती धावफलकावर दिसत होती. चौथ्या षटकात अंकित बावणे बाद झाला. ११व्या षटकात सौरभ नवले (१२) बाद झाला.
पाच बाद १८ अशा बिकट स्थितीत ऋतुराज गायकवाड आणि जलज सक्सेना या जोडीने १२२ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. सक्सेनाचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. जलज सक्सेना १०६ चेंडूत ४९ धावा काढून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. त्यानंतर ऋतुराज गायकवाडची चिवट झुंज ९१ धावांवर संपुष्टात आली. महाराष्ट्र संघाची सर्वात मोठी भिस्त गायकवाडवर होती. त्याने १५१ चेंडूत ११ चौकारांसह ९१ धावा काढल्या. तो मोठी खेळी खेळेल असे वाटत असताना अपल याने त्याला बाद करुन महाराष्ट्राला मोठा धक्का दिला. विकी ओस्तवाल (१०) व रामकृष्ण घोष (११) ही जोडी खेळत आहे.
केरळ संघाकडून एम डी निधीश याने घातक गोलंदाजी करत ४२ धावांत चार विकेट घेतल्या. एन तुळस याने ४४ धावांत दोन गडी बाद केले. एडन अपल याने ३८ धावांत एक गडी बाद केला.
विदर्भ भक्कम स्थितीत, तीन बाद ३०२
रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाने नागालँड संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८५ षटकात तीन बाद ३०२ धावसंख्या उभारुन सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. अथर्व तायडे (१८) व रविकुमार समर्थ (३) हे दोघे स्वस्तात बाद झाले. सलामीवीर अमन मोखाडे याने शानदार शतक ठोकून डावाला आकार दिला. त्याने २६१ चेंडूत नाबाद १४८ धावा फटकावल्या आहेत. त्याने १६ चौकार मारले. ध्रुव शोरी याने ९२ चेंडूत आठ चौकारांसह ६४ धावा काढल्या. यश राठोड याने १०४ चेंडूत नाबाद ६६ धावा काढल्या आहेत. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. नागालँड संघाकडून सौरव कुमार याने ५७ धावांत दोन बळी टिपले आहेत.
मुंबई पाच बाद ३३६
सिद्धेश लाडच्या शानदार ११६ धावांच्या बळावर मुंबई संघाने ८३ षटकांच्या खेळात पाच बाद ३३६ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे. मुशीर खान (०), आयुष म्हात्रे (२८), अजिंक्य रहाणे (२७) हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. सिद्धेश लाडने शतक साजरे केले. सरफराज खान याने ४२ धावांची आक्रमक खेळी केली. शम्स मुलानी याने १२५ चेंडूत नाबाद ७९ धावा फटकावत डावाला आकार दिला. त्याने आठ चौकार व एक षटकार मारला. आकाश आनंद याने दोन चौकारांसह नाबाद १५ धावा काढल्या आहेत. युधवीर सिंग चरक याने ८२ धावांत दोन बळी टिपले आहेत.