 
            ठाणे (रोशनी खेमानी) ः ठाणे महानगरपालिका जिल्हास्तरीय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय खो-खो स्पर्धेला मोठ्या उत्साहात ठाण्यातील श्री मावळी मंडळ क्रीडा नगरी येथे सुरुवात झाली.
ही स्पर्धा १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडत असून ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण २३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये मुले-मुली अशा १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटातील संघांचा समावेश आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन मुंबई विभाग संपर्क प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे ठाणे जिल्ह्याोध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांच्या हस्ते मैदानाची पूजा करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमोद वाघमोडे म्हणाले की, “खेळाडूंनी खेळाचे नियम पाळावेत आणि पंचांचे निर्णय शिस्तबद्धपणे मान्य करावेत. त्यामुळे खेळाडूंत क्रीडा भाव विकसित होतो आणि स्पर्धेचा दर्जा उंचावतो. आजच्या काळात मोबाईलच्या विळख्यात अडकण्याऐवजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ मैदानावर व्यतीत करावा, नियमित सराव करावा आणि क्रीडेमधून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधावा. क्रीडा शिक्षकांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना खेळात सहभागी करून मैदानावर आणावे.”
त्यांनी पुढे सर्व पंच, प्रशिक्षक आणि खेळाडूंना स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका उपायुक्त मीनल पालांडे व क्रीडा समन्वयक शंकर बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
या प्रसंगी स्पर्धा प्रमुख सतीश जाधव, रणजीत शिंदे, पांडुरंग ठोंबरे, माजी मुख्याध्यापक संजय थोरात, खो-खो प्रशिक्षक प्रणय कांबळे, तसेच ठाण्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, पंच आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला असून, मैदानावर जोशपूर्ण आणि दर्जेदार सामने पाहायला मिळाले. आगामी तीन दिवस ठाणे क्रीडा नगरीत खो-खोच्या रोमांचक लढतींची रंगत अनुभवायला मिळणार आहे.



