
तिरुवनंतपुरम ः रणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने पाच बाद १८ अशा खराब स्थितीतून सर्वबाद २३९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजांनी केरळच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात बाद करुन जोरदार कमबॅक केले आहे. गत उपविजेत्या केरळ संघाने १०.४ षटकात तीन बाद ३५ धावा काढल्या आहेत.
सामन्याचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या तळाचे फलंदाज, गोलंदाज व खराब हवामानाने गाजवला. ऋतुराज गायकवाड ९१ धावांवर बाद झाल्यानंतर महाराष्ट्र संघ लवकर बाद होईल असे वाटले होते. गायकवाड बाद झाला तेव्हा महाराष्ट्र संघाची स्थिती सात बाद १६४ अशी बिकट होती. त्यानंतर विकी ओस्तवाल व रामकृष्ण घोष या अष्टपैलू खेळाडूंनी चिवट फलंदाजी करत डावाला आकार दिला. विकी ओस्तवाल याने ११० चेंडूंत ३८ धावांची दमदार खेळी केली. त्याने तीन चौकार मारले. रामकृष्ण घोष याने ७६ चेंडूंत ३१ धावा काढल्या. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. रजनीश गुरबानी १० धावांवर बाद झाला. महाराष्ट्र संघाचा पहिला डाव ८४.१ षटकात २३९ धावांत सर्वबाद झाला.
केरळ संघाकडून निधीश याने ४९ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. नेदुमंकुझी तुळस याने ५७ धावांत तीन बळी टिपले.
केरळ संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. रजनीश गुरबानी याने अक्षय चंद्रन याला शून्यावर बाद केले. त्यानंतर बाबा अपराजित (६) हा अनुभवी फलंदाज देखील लवकर बाद झाला. रोहन कुन्नमल याने आक्रमक २७ धावा काढल्या. त्याने चार चौकार मारले. जलज सक्सेना ने त्याला बाद करुन केरळला तिसरा धक्का दिला. सचिन बेबी (०) व संजू सॅमसन (०) ही जोडी खेळत आहे. रजनीश गुरबानी याने भेदक गोलंदाजी करत २० धावांत दोन गडी बाद केले. सक्सेना याने चार चेंडू टाकत एक बळी टिपला. सामन्याचा तिसरा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. सद्यस्थितीत हा सामना रंगतदार स्थितीत आहे.