पीसीसीए अंडर १५ गर्ल्स संघाला विजेतेपद 

  • By admin
  • October 17, 2025
  • 0
  • 158 Views
Spread the love

एमसीए अंडर १५ गर्ल्स क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए संघाला उपविजेतेपद

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १५ गर्ल्स एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पीडीसीए संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पीडीसीए संघाने डीव्हीसीए संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

पीडीपीए आणि डीव्हीसीए यांच्यातील अंतिम सामना गहूंजे येथील एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. पीडीसीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डीव्हीसीए संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकात सहा बाद १९९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना पीडीसीए संघाने ३३.५ षटकात तीन बाद २०३ धावा काढून सात विकेटने सामना जिंकला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

या सामन्यात गायत्री हांडे हिने दमदार फलंदाजी केली. तिने १०३ चेंडूंचा सामना करत ८० धावांची लक्षवेधक अर्धशतकी खेळी केली. तिने आठ चौकार व एक षटकार मारला. राशी व्यास हिने आठ चौकारांसह ६० धावा फटकावल्या. सायली शिंदे हिने ३६ चेंडूत ५७ धावांची आक्रमक खेळी केली. तिने तीन चौकार व चार उत्तुंग षटकार मारले.

गोलंदाजीत आराध्या भामरे (१-२३), प्रणवी गाढवे (१-३३), युगंधरा भापकर (१-३५) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
पीडीसीए अंडर १५ विजेता संघ
स्वरा (कर्णधार), आराध्या भामरे, मृण्मयी गणवीर, सायली शिंदे, सई जोंधळे, सिद्धी घाडगे, अंकिता जरुपाला, गायत्री हांडे, युगंधरा भापकर, आनंदी पाटील, प्रतीक्षा झिंजाडे. 

पारितोषिक वितरण विजेत्या व उपविजेत्या संघाला महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स परिषदेचे सदस्य सुनील मुथा व शुभेंद्र भांडारकर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *