
पुणे ः दिवाळी सणाच्या निमित्ताने बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बीकेटी रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेत १९९ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह या ठिकाणी १८ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेत एकूण ३५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आठ फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. तसेच, ही स्पर्धा १० वर्षाखालील गट, १४ वर्षाखालील गट आणि खुल्या गटात पार पडणार आहे.
स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये वीरेश, कुशाग्र जैन, विहान शहा, मंतिक अय्यर, क्षितिज प्रसाद, परम जालन हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
आयए अथर्व गोडबोले चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक अनिल राजे यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आंतर जेल बुद्धिबळ स्पर्धेत प्रशिक्षक केतन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा सेंट्रल जेल संघाने विजेतेपद पटकावले असून त्यामुळे या प्रसंगी केतन खैरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.