
परभणीच्या गांधी विद्यालयास जेतेपद
सेलू ः जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नूतन विद्यालय, सेलू यांच्या वतीने आयोजित शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार डॉ शिवाजी मगर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदलाल परताणी, उद्योजक निलेश बिनायके, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, मनीष कदम, दामिनी पथक प्रमुख अस्मिता मोरे, जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव गणेश माळवे आणि तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व मनपा, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी (ग्रामीण व मनपा) अशा सात संघांतील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील एकूण ५५४ खेळाडूंनी या मॅट कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
उद्घाटनावेळी बोलताना डॉ शिवाजी मगर म्हणाले की, “खेळातून व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच नेतृत्वगुण, संघभावना आणि खेळाडूपणा विकसित होतो. शासनाच्या विविध क्रीडा सुविधा योजनांमुळे ग्रामीण भागातही खेळाडूंना प्रगतीची संधी मिळत आहे. नूतन विद्यालयाने उभारलेल्या इनडोअर क्रीडा हॉलमुळे स्पर्धा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित झाल्या आहेत.”
बक्षीस वितरण समारंभ
बक्षीस वितरण सोहळ्यात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ एस एम लोया, सचिव डॉ व्ही के कोठेकर, जयसिंग शेळके, आर एस मोगल, पी आर जाधव, माधव शिंदे आणि ज्ञानेश्वर गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी संजय भुमकर, राजेश राठोड, किशोर ढोके, राहुल घांडगे, धीरज नाईकवाडे, प्रा. सत्यम बुरकुले, कुणाला चव्हाण, विशाल ढवळे यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून योगेश जोशी, कलिम शेख, खाजा अब्दुल खदीर, निलेश पवार आणि विठ्ठल पुरी यांनी कार्य केले. या स्पर्धेने सेलू शहरात क्रीडाप्रेमींच्या उत्साहाला नवी झळाळी दिली असून ग्रामीण भागातील शालेय खेळाडूंच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षे मुले गट : प्रथम – गांधी विद्यालय, परभणी मनपा, द्वितीय – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण.
१७ वर्षे मुले गट ः प्रथम – जालना, द्वितीय – बीड.१९ वर्षे मुले गट : प्रथम – बीड, द्वितीय – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण.
१४ वर्षे मुली गट : प्रथम – जिल्हा परिषद प्रशाला, जालना, द्वितीय – मा. फुले विद्यालय, गंगापूर (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण).
१७ वर्षे मुली गट : प्रथम – विवेकानंद माध्यमिक विद्यालय, काळेगाव हवेली (बीड), द्वितीय – विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, गंगाखेड (परभणी ग्रामीण).