
डिंपल यादव व अनुष्का राजपूत यांची आंतर-विभागीय स्पर्धेसाठी निवड
नाशिक ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या अधिपत्याखाली आणि नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या आयोजनात नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, महिरावणी (नाशिक) या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
कला वाणिज्य महाविद्यालय, ताहराबाद (सटाणा) येथे झालेल्या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग (महिला) स्पर्धेत संदीप महाविद्यालयाच्या डिंपल यादव हिने ५७ ते ६० किलो वजनगटात प्रभावी कामगिरी करत वाघोली, पुणे येथे होणाऱ्या आंतर-विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
दरम्यान, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी (नाशिक) यांच्या मार्फत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे झालेल्या आंतर-महाविद्यालयीन हॉकी (महिला) स्पर्धेत संदीप महाविद्यालयाच्या अनुष्का राजपूत हिने चमकदार खेळ सादर करून पुणे येथे होणाऱ्या आंतर-विभागीय हॉकी स्पर्धेसाठी नाशिक विभाग संघात स्थान निश्चित केले.
या दोन्ही खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक सहायक प्राध्यापक स्वप्निल करपे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण मेहनत, खेळाडूवृत्ती आणि समर्पणातून यश संपादन केले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ संदीप झा, मेंटॉर प्रा प्रमोद करोले, विवेक निकम, प्राचार्य डॉ दीपक पाटील, तसेच संदीप विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ परेश रेगे आणि डॉ संदीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुढील आंतर-विभागीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या यशाने संदीप संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीला नवा वेग मिळाला असून, महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची संस्थेची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.