
तिरुवनंतपुरम ःरणजी ट्रॉफी हंगामाच्या पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी धक्कादायक सुरुवात करणाऱया महाराष्ट्र संघाने गतउपविजेत्या केरळ संघाविरुद्ध पहिल्या डावात २० धावांची आघाडी घेण्यात यश मिळवले. तिसऱया दिवसअखेर महाराष्ट्र संघाने ७१ धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात ८४.१ षटकात सर्वबाद २३९ धावसंख्या उभारली. एकवेळ महाराष्ट्राचे आघाडीचे पाच फलंदाज १८ धावांत तंबूत परतले होते. ऋतुराज गायकवाड (९१), जलज सक्सेना (४९), रामकृष्ण घोष (३१) व विकी ओस्तवाल (३८) यांच्या दमदार फलंदाजीमुळे महाराष्ट्र संघाचा डाव सावरला गेला. केरळकडून निधीश याने ४९ धावांत पाच विकेट घेतल्या.
महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करुन केरळ संघाला पहिल्या डावात २१९ धावांवर रोखले. ६३.२ षटकात केरळचा डाव संपुष्टात आला. सॅमसन (५४), अझरुद्दीन (३६), सलमान निजार ४९), कुन्नम्मल (२७) यांनी डाव सावरला. यात जलज सक्सेना (३-४६), मुकेश चौधरी (२-५७), रजनीश गुरबानी (२-४९), विकी ओस्तवाल (२-२५), रामकृष्ण घोष (१-१९) यांनी प्रभावी गोलंदाजी करुन संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.
महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. पृथ्वी शॉ आणि अर्शीन कुलकर्णी या सलामी जोडीने ९ षटकात ५१ धावांची भागीदारी केली आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा महाराष्ट्र संघाने बिनबाद ५१ धावा काढल्या होत्या आणि महाराष्ट्राने सामन्यात ७१ धावांची आघाडी घेतली आहे. ा