
शेख हबीब स्मृती क्रिकेट स्पर्धेचा शनिवारी गरवारे क्रिकेट स्टेडियमवर समारोप
छत्रपती संभाजीनगर ः शेख हबीब स्मृती टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत इम्रान पटेल २२ नाबाद आणि असरार इलेव्हन या संघांनी चुरशीचे सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदाचा सामना शनिवारी रंगणार आहे. उपांत्य सामन्यात शफी असरार आणि ऋषिकेश नायर हे सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर उपांत्य फेरीचे सामने झाले. पहिल्या लढतीत इम्रान पटेल २२ नाबाद या संघाने नाथ ड्रीप संघाचा रोमांचक सामन्यात अवघ्या तीन धावांनी पराभव केला. यात इम्रान पटेल संघाने १८.३ षटकात सर्वबाद १२२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात नाथ ड्रीप संघ २० षटकात सर्वबाद ११९ धावा काढू शकला.
या सामन्यात आसिफ खान (२८), विश्वजीत राजपूत (२८) व अनिकेत काळे (२६) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत ऋषिकेश नायर (३-९), ऋषिकेश सोनवणे (३-२१) व अनिल जाधव (२-१) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या.
लाईफ लाइन नेरळकर अकादमी पराभूत
दुसरा उपांत्य सामना असरार इलेव्हनने ४५ धावांनी जिंकला. असरार इलेव्हनने २० षटकात चार बाद २६५ असा धावांचा डोंगर उभारला. लाईफ लाइन नेरळकर क्रिकेट अकादमी संघाने २० षटकात आठ बाद २२० धावा काढल्या.
या सामन्यात शफी असरार याने तुफानी शतक ठोकले. त्याने अवघ्या ४५ चेंडूत १२० धावांची वादळी शतकी खेळी केली. त्याने पाच चौकार आणि तब्बल १४ उत्तुंग षटकार ठोकले. सिद्धार्थ पाटीदार याने ४० चेंडूत ७५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने चार षटकार व आठ चौकार मारले. आनंद ठेंगे याने ३२ चेंडूत ६५ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याने पाच टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. गोलंदाजीत आनंद ठेंगे याने ३० धावांत तीन गडी बाद केले. विनायक भोईर याने ३२ धावांत तीन विकेट घेतल्या. मुस्तफा शाह याने १९ धावांत दोन बळी घेतले.