
कुलगुरू माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन
नाशिक ः आरोग्य विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन राष्ट्रीय स्तरावर पोहचले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर व प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांच्या पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ सचिन मुंबरे, डॉ राजकुमार पाटील, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर, विद्या परिषद सदस्य डॉ अजित फुंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाचे नाव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. सेवेतील अनुभव आणि शिस्त, आरोग्य क्षेत्रातील कार्याची आवड आणि आपल्या सर्वांची साथ यामुळेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेता आले आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी झाली. संशोधन, आंतरविद्याशाखीय समन्वय आणि गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठाने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. विद्यापीठाने शैक्षणिक कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे, अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करणे आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये योग्य समन्वय राखणे यामध्ये त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. विशेषतः तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत परीक्षा प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ सचिन मुंबरे यांनी सांगितले की, कुलगुरू यांची व्हिजन डॉक्युमेंट ही संकल्पना खरोखर अनोखी आणि प्रभावी होती. कमी कालावधीत प्रशासनाच्या नियमाने व शिस्तीने काम करणाऱ्या कुलगुरुंच्या काळात काम करण्याची मला संधी मिळाली असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या परिवारात आम्हाला सहभागी करुन सेवा करण्याची संधी मिळाली यातच माझे भाग्य समजतो. विद्यापीठ परिवाराकडून जे प्रेम व आदर मिळाला यातच मी ऋणी आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपकुलसचिव डॉ नितीन कावेडे यांनी समन्वयन केले. याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, उपकुलसचिव डॉ सुनील फुगारे, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, विद्या परिषदेचे सदस्य डॉ अजित फुंदे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ स्वाती जाधव, माजी परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक, संजय मराठे, संदीप राठोड, संदीप महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी सुरेश शिंदे, राहुल विभांडिक, नंदकिशोर वाघ, तुषार शिरुडे, उज्वला साळुंके, प्रवीण सोनार यांनी परिश्रम घेतले.